स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Thursday, 23 March 2017

डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र (भाग-२)

डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र (भाग-२)जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसागणिक वाढत चालला असून आपल्या दैनंदिन आयुष्याचा बहुतांशी भाग डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापून टाकला आहे. २०२० पर्यंत संपूर्ण जग डिजिटल होईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हे होत असतानाच डिजिटल मार्केटिंगच्या पर्यायाने सोशल मीडियाच्या क्षेत्रातदेखील रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत आहेत. पहिल्या भागात डिजिटल मार्केटींग म्हणजे काय, त्याचे घटक त्या क्षेत्रातील संधी आपण पाहिल्या. आता आपण बघणार आहोत या क्षेत्रातील कामाचे स्वरुप, जबाबदारी, आवश्यक पात्रता, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आदींची माहिती.

कामाचे स्वरुप, जबाबदारी -

डिजिटल मार्केटिंग डायरेक्टर/मॅनेजर


डिजिटल मार्केटिंग डायरेक्टर किंवा मॅनेजर हे एक वरिष्ठ पद आहे. डिजिटल मार्केटिंग मधला किमान ५-७ वर्षांचा अनुभव असलेला व्यक्ती या पदावर काम करु शकतो. डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन्सचे नियोजन, वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नियमित अपडेट करण्याची महत्त्वाची जबाबदारी यांची असते.

वेब डेव्हलपर आणि वेब डिझाईनर

आकर्षक, दर्जेदार वेबसाईट बनविण्याची महत्त्वाची जबाबदारी यांची असते. वेब डेव्हलपर वेबसाईट बनविण्याची जबाबदारी पार पाडत असले तरी वेब डिझाईनरला खूप साऱ्या क्रिएटिव्ह गोष्टी कराव्या लागतात. वेबसाईट वापरकर्त्यांसाठी सुलभ म्हणजेच युझर फ्रेन्डली बनविण्यासाठी तिचे डिझाईनिंग, कोडिंग आणि मॉडिफाईंग करायचे काम वेब डेव्हलपर आणि वेब डिझाईनरला करावे लागते. जावा स्क्रीप्ट, जे क्युरी, एचटीएमएल, सीएसएस आणि वेब प्रोग्रॅमिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सोशल मिडिया एक्झिक्युटिव्ह ॲण्ड सोशल मीडिया मॅनेजर

सोशल मीडियातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. सोशल मीडियातील लेटेस्ट ट्रेण्डस पाहणे, सोशल मीडिया स्ट्रॅटिजी ठरविणे, सोशल मीडियासाठी कन्टेन्ट आणि क्लायन्ट टीमबरोबर नियमित समन्वय ठेऊन दर्जेदार मजकूर (इन्फोग्राफिक, व्हिडिओ, ऑडिओ आदी) तयार करणे. या कामासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आणि क्रिएटिव्हिटी असणे आवश्यक आहे.

सर्च इंजिन एक्झिक्युटिव्ह/सर्च इंजिन एक्सपर्ट

एखादी वेबसाईट कितीही आकर्षक, दर्जेदार असली पण ती जर लोकांपर्यंत पोहोचली नाही तर काहीच उपयोग नसतो. त्या वेबसाईटच्या प्रसारासाठी सर्च इंजिन ऑप्टिमाईझेशनची नितांत आवश्यकता असते. त्या कामासाठीच सर्च इंजिन एक्झिक्युटिव्ह/सर्च इंजिन एक्सपर्टची नियुक्ती केली जाते. कंपनीच्या वेबसाईटला वेबजालावर अधिकाधिक प्रमोट करण्यासाठी, वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि गुगल रॅंकिंगमध्ये वरचा क्रमांक आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागते. वेबसाईटवरील मजकूर हा सहजपणे शोधता येईल, त्यासाठी कीवर्डस तयार करणे, एसईओ टुल्सचे संशोधन, साईटमॅप अशा विविध जबाबदाऱ्या या सर्च इंजिन एक्झिक्युटिव्ह/सर्च इंजिन एक्सपर्टला पार पाडाव्या लागतात.

पीपीसी/एसईएम तज्ज्ञ

PPC म्हणजे Pay Per Click Expert तर SEM म्हणजे Search Engine Marketing Manager.. इंटरनेटवर सर्फिंग करीत असताना काही महत्त्वाच्या उपयुक्त तर काही कंटाळवाण्या ॲडस ज्या आपल्याला दिसतात, त्या सर्व हे एक्सपर्ट तयार करीत असतात. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये या तज्ज्ञांना मोठी मागणी असते. इंटरनेट साईटवर अधिकाधिक लोकांची ट्रॅफ‍िक वाढविण्यासाठी Pay Per Click कीवर्डस, स्प्लीट ॲड ग्रुप्स, अहवाल तयार करणे, ग्राफिक्स आणि ॲड कॉपीजसाठी मजकूर सूचविण्याचे काम हे एक्सपर्ट करीत असतात.

कन्टेन्ट मार्केटर

जर तुम्ही इतरांपेक्षा अधिक चांगले, आकर्षक वेबसाईटसाठी कॉपी लिहित असाल तर तुम्ही कन्टेन्ट मार्केटर म्हणून नक्कीच काम करु शकता. सोशल मीडिया किंवा इन्स्टन्ट मेसेजिंगमध्ये लगेच व्हायरल होण्याची गुणवत्ता असलेला मजकूर निर्मितीचे काम कन्टेन्ट मार्केटरला करावे लागते. हा मजकूर सर्च इंजिन ऑप्टिमाईझेशनद्वारा आणि इतर टीम सदस्यांच्या समन्वयातून अधिकाधिक प्रमोट करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्यामुळे त्यात अधिक क्रिएटिव्हिटी असणे आवश्यक असते. कन्टेन्ट मार्केटिंगचे काम करताना इंग्रजीबरोबर स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

ग्राफिक डिझाईनर

सोशल मीडिया टीमला क्रिएटिव्ह कन्टेन्टसह सहकार्य करणे. आपल्या प्रकल्प किंवा उत्पादनाच्या प्रसारासाठी ग्राफिक मांडणी करण्याकरिता संकल्पना तयार करणे. कॅम्पे कॅम्पेनसाठी डिझाईन विकसित करणे.

ॲप डेव्हलपर

डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲप हे एक महत्त्वाचे माध्यम असून मोठ्या व्यावसायिक, औद्योगिक संस्था किंवा प्रसारमाध्यम संस्थांचे स्वतःचे मोबाईल ॲप जेव्हा तयार करतात त्यावेळी ॲप डेव्हलपरची गरज भासते. ॲन्ड्रॉईड किंवा आयफोनसाठी (आयओएस) ॲप डिझाईन-विकसित करुन त्याची देखभाल करण्याचे काम ॲप डेव्हलपरचे असते. ॲपच्या सुरुवातीपासून ॲप कार्यन्वित होऊन त्यानंतर त्याला सपोर्ट करण्याचे काम करावे लागते.

इनबाऊन्ड मार्केटिंग मॅनेजर

इनबाऊन्ड मार्केटिंग मॅनेजर हा डिजिटल टीममधील एक घटक असून सोशल मीडिया, एसईओ, ईमेल मार्केटिंगच्या संबंधीने डेटा आणि सांख्यिकी विश्लेषण करण्याचे काम तो करतो. कॅम्पेनचे यशापयश तपासण्याचे काम हा मॅनेजर करीत असतो. विश्लेषणात्मक नवीन डिजिटल रिपोर्टिंग पद्धती तयार करण्याबरोबरच कॅम्पेनचे सादरीकरण अजून दर्जेदार होण्यासाठी नवनवीन तंत्र आणि साधने विकसित करण्याचे काम हे इनबाऊन्ड मार्केटिंग मॅनेजर करीत असतात.

डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात कन्व्हर्जन रेट ऑप्टिमाईजर, ॲनालिटिक्स मॅनेजर, सीआरएम मॅनेजर, ईमेल मार्केटिंग मॅनेजर, ई-कॉमर्स मॅनेजर, डिजिटल एजन्सी अकाऊन्ट डायरेक्टर अशा विविध तज्ज्ञांच्या स्वरुपात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.

डिजिटल मार्केटिंग किंवा मीडियासाठी साधारणपणे पात्रता

 • संबंधित विषयातील पदवीधर
 • एमबीए (मार्केटिंग), मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम, किंवा ग्राफिक डिझाईनमध्ये पदवीधर असलेल्यांना संधी
 • संगणकशास्त्रातील पदवीधरांसाठी आणि ॲडव्हान्स्ड विविध पदवी, पदविका प्राप्त तरुण-तरुणींसाठी हे एक आव्हानात्मक क्षेत्र
 • मॅक, लिनक्स, विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिम्सची तसेच आयओएस/ॲन्ड्रॉईड मोबाईल प्रणालीचे ज्ञान असणे आवश्यक.
 • इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक
 • एसईओ आणि वेब ट्रॅफिक मेट्रिक्सची माहिती असावी
 • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविषयी सविस्तर माहिती
 • जावा, एचटीएमएल यासारख्या भाषांची माहिती
 • व्हिडिओ एडिटिंग आणि विविध आधुनिक ग्राफिक डिझाईनिंग सॉफ्टवेअर्स हाताळता येणे आवश्यक
 • डेटा आणि सांख्यिकीचे विश्लेषण करण्याची क्षमता

डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था-

 • केंद्र शासनाचे एमएसएमई-टेक्नॉलॉजी डेव्हलपमेन्ट सेंटर आग्रा- महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक प्रशिक्षण केंद्र. प्रवेशासाठी पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदविकाधारक. संपर्क- प्रधान संचालक, एमएसएमई-टेक्नॉलॉजी डेव्हलपमेन्ट सेंटर. (पीपीडीसी), फाऊन्ड्री नगर, आग्रा-२८२००६ ईमेल- info@ppdcagra.in, वेबसाईट- www.ppdcagra.in
 • डिजिटल विद्या, नवी दिल्ली - सर्टिफाईड डिजिटल मार्केटिंग मास्टर कोर्स. हा कोर्स ऑनलाईन आहे.
 • एज्युकार्ट, नवी दिल्ली - हे एक देशातील नामवंत डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्युट असून डिजिटल मार्केटिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. हा कोर्स ऑनलाईन सुद्धा करता येतो.
 • डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, हैद्राबाद- डिजिटल मार्केटिंगसह सर्च इंजिन ऑप्टिमाईझेशन, गुगल ऍडवर्डस/पे पर क्लिक/एसईएम आणि सोशल मीडिया ऑप्टिमाईझेशनचे कोर्सेस येथे आहेत.
नेटकऱ्यांची दिवसागणिक वाढणारी संख्या, इंटरनेट, स्मार्टफोन्सचा वाढता वापर आणि त्यातून विविध कंपन्या, संस्थांनी ऑनलाईन मार्केटिंगला दिलेले प्राधान्य पाहता डिजिटल मार्केटिंगमधील करियर युवा पिढीसाठी जरा हटके असे करियर क्षेत्र आहे, हे निश्चित…

- किशोर गांगुर्डे
(लेखक हे शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या सोशल मीडिया कक्षाचे वरिष्ठ सहायक संचालक आहेत)
kishorgangurde@gmail.com

No comments:

Post a Comment